Ahmednagar News ः अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील 12 हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या अनुदान योजनेतून 11 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान मिळाले. दूध उत्पादकांना राज्य सरकारचे पाच रुपये प्रति लिटर अनुदान देऊन काहीसा दिलासा दिला असला तरी प्रत्यक्षात दुधाचे भाव वर्षभरात दहा रुपये लिटर इतके कमी झाल्यामुळे दूध उत्पादकांचे प्रत्यक्षात झालेले नुकसान फार मोठे आहे. वर्षभरात अनेक कोटींचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे.
राहुरी तालुक्यात दररोज चार लाख लिटर सरासरी दूध संकलन होते. प्रतिलिटर दहा रुपये कमी भाव या दराने दररोज चाळीस लाख रुपयांचा प्रतिदिन दूध उत्पादकांना फटका बसतो. दोन महिन्यात चोवीस कोटी रुपयांपेक्षाही अधिक फटका बसलेला आहे. अनुदान योजनेतून उद्दिष्टाच्या 50 टक्केपर्यंत काम झाले आहे. ऊर्वरीत दूध उत्पादकांना अनुदान लाभ मिळण्याची व्यवस्था केली जात असल्याचे पंचायत समितीस्तरावर सांगितले गेले. तरीही नुकसानीच्या तुलनेत अनुदानाच्या रुपातील भरपाई प्रमाण निम्मेच आहे.
वस्तूस्थिती अशी…
दोन गाय विकल्या. दूध धंदा बंद करुन अन्यत्र रोजगार ते शोधत आहेत. पशुखाद्याचे वाढलेले दर,उत्पादन खर्च व घसरलेल्या दरामुळे दूध धंदा तोट्यात गेला आहे.
– प्रकाश पाठक, टाकळीमियाँ
13 गायी होत्या. आता केवळ तीनच गाय ठेवल्या आहेत. दहा गायी विकताना प्रत्येक गायीमागे सहा हजार ते 15 हजार रुपयापर्यंत नुकसान सहन करावे लागले. जनावरांच्या बाजारातही गायींचे दर शेतकऱ्यांकडून खरेदीसाठी कमी झाले असले तरी त्यांना खरेदीदार आहेत.
– बबलू पेरणे, तांदुळवाडी
वर्षभरात दुधाचे भाव टप्प्याटप्प्याने दहा रुपये लिटरने कमी झालेले आहेत .जानेवारी 2023 मध्ये 36.79 रुपये लिटर असणारा भाव आज 26.58 रुपये लिटर आहे. महाराष्ट्रात सुमूल, पंचमूल, हेरिटेज आदी यंत्रणा दूध उत्पादकांचे दूध खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या राज्यात दूध उत्पादकांना ते वर्षभरापासून 35 रुपये अधिक भाव देत आहेत. त्या राज्यातील दूध उत्पादकांना जर 35 अधिक भाव मिळतो, तर महाराष्ट्र राज्यातील दूध उत्पादकांना का बरं कमी दिला जातो याचे उत्तर सापडत नाही. तब्बल दहा रुपये प्रति लिटर भावाचा का बर फटका दिला जातो, असा प्रश्न दूध उत्पादक विचारत आहेत. या प्रश्नाला राज्य सरकार देखील समर्थ पर्याय शोधत नसल्यामुळे केवळ पाच रुपये प्रति लिटर अनुदान देऊन दूध उत्पादकांना अंशतः दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करताना दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात भाव त्या पद्धतीने मिळण्यासाठीची व्यवस्था राज्य सरकारने उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशीच दूध उत्पादकांची अपेक्षा आहे.
दूध खरेदीचे दर कमी झाले असले तरी दूध ग्राहकांना विक्रीचे दर मात्र वर्षभरात कुठेही कमी झालेले नाहीत. सर्वसाधारण 45 रुपये लिटर विकले जाणारे दूध आजही त्याच दराने विकले जात आहे. तसेच दुधाच्या उपपदार्थांच्या बाजारपेठेतही भाव वाढलेले आहेत आणि ते टिकूनही आहेत. मात्र असे असले तरीही प्रत्यक्षात दूध उत्पादकांना मात्र मोठा घाटा सहन करावा लागतो. दूध उत्पादनाचा खर्चच प्रति लिटर 24-25 रुपये, असा आहे. त्यातही गाय आजारी पडल्या की हा खर्च वाढतो. मक्याचे दर कमी झाले आहेत. कारण खाद्यासाठी 2500 रुपये क्विंटल असणारा मका आज 1800 रुपये झाला आहे. कारण वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी मका खाद्य वापरण्याचे प्रमाण कमी कमी केले. अनेकांनी नफा न मिळाल्याने व्यवसायापासून दूर जाणे पसंत केले.
पशुखाद्यामध्ये वर्षभरात झालेली वाढ
घास- तीन रुपये किलो
मका- 1200 रुपये गुंठा
वैरण- 1200 रुपये शेकडा
गिन्नी गवत- 1200 रुपये गुंठा
ऊस- 3300-3500 रुपये टन
पशुखाद्य पन्नास किलोचे दर रुपयांत
पेंड ः 15000-1600
कांडी : 1400-15000
वालीस ः 1100-1400
मका हरडा व पीठ ः 1500-1600
गव्हाचा भुस्सा : 4000-6000 (दर टनामध्ये)
दुधाचे वर्षभरातील दर स्थिती प्रति लिटर
जानेवारी 2023- 36.79
फेब्रुवारी, मार्च,एप्रिल- 37.94
मे- 36.79
जून- 35.88
जुलै- 34.05
आँगस्ट- 33.30
सप्टेंबर- 34.05
आँक्टोबर- 33.30
नोव्हेंबर- 31.33
डिसेंबर- 29.06
जानेवारी 2024- 26.58