महाराष्ट्रातील नाशिक इथं करन्सी नाेट प्रेसला नेपाळ देशाच्या एक हजार रुपयांच्या 430 दशलक्ष, तर पन्नास रुपयांच्या 300 दशलक्ष नाेटा छापण्याचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे देश-विदेशाच्या चलनी नाेटा छापणाऱ्या करन्सी नाेट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कंत्राट बूस्टर डाेस ठरला आहे. नेपाळ सरकारबराेबर हा करार नुकताच झाल्याची माहिती आयएसपी-सीएनपी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गाेडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.
भारत सरकारच्या डिजिटल करन्सीमुळे प्रेस कर्मचाऱ्यांसमाेर वेगळेच आव्हान हाेते. कर्मचारी कपातीची टांगती तलवार हाेती. यामुळे देशातीलच नव्हे इतर छाेट्या परदेशांच्या नाेटांचे कंत्राट मिळवून वेगळ्या वाटा शाेधण्यावर प्रेस प्रशासनासमाेर हाेते. यावर विदेशातील करन्सी छापण्याचा प्रस्ताव प्रेस प्रशासनासमाेर मजदूर संघाने दिला. त्याला प्रशासनाने तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी नेपाळ देशाची करन्सी छापण्याचे कंत्राट मिळाले. या कंत्राटमुळे प्रेस करन्सीमधील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. आता मशिनरी आधुनिकरणाची मागणी हाेऊ लागली आहे. त्यानुसार ते सुरू देखील झाले आहे. नेपाळ देशाच्या नाेटांबराेबरच भारताच्या एकूण 5300 दशलक्ष नाेटा छापण्याचे माेठे कामही प्रेसला मिळाले आहे. चीनसारख्या देशाला नाेटांचे कंत्राट मिळण्याच्या स्पर्धेला मागे टाकून नेपाळ देशाचे कंत्राट नाशिकच्या प्रेस करन्सीने मिळवले आहे. या कंत्राट मिळविण्यात चीनबराेबर फ्रान्स देखील पुढे हाेता. परंतु या दाेन्ही देशाला नाशिकच्या प्रेस करन्सीने मागे टाकले आहे.